Ganpati Special ST Bus: १३ ऑगस्टनंतरही कोकणात गणपती विशेष एसटी; ‘ही’ आहे मुख्य अट

मुंबई:कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चाकरमान्यांसाठी १२ ऑगस्टनंतरही एसटीच्या विशेष बस चालवल्या जाणार आहे. त्याबाबतचे नियम व अन्य बाबी आज स्पष्ट करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ही बससेवा दिली जाणार आहे. ( Ganpati SpecialMSRTC Bus)

राज्य परिवहन महामंडळाने चाकरमान्यांसाठी करण्यात येत असलेल्या बस व्यवस्थेची माहिती आज जाहीर केली. १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

वाचा: चाकरमानी-गावकऱ्यांमध्ये खटके; पालकमंत्री सामंतांनी दिला ‘हा’ सल्ला

तिकीट आरक्षण आणि अटी

> प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड – १९ ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणे अनिवार्य असून सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असेल तरच संबंधितांना प्रवास करता येईल.

> मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवरून चाकरमान्यांसाठी १३ तारखेपासून या बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत. या बसेस आज रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील.

> आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड- १९ ची चाचणी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही.

> प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही.

वाचा: कोकणातील चाकरमान्यांसाठी मनसेची बस सेवा सुरु

१० हजार प्रवाशांनी केले आगाऊ आरक्षण

गणेशोत्सव २२ ऑगस्टपासून सुरू होत असून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने ६ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकावरून बसेस सुरू केल्या आहेत. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज अखेर तब्बल १० हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. योग्यरित्या सॅनिटाइझ केलेल्या बसेस महामंडळाने प्रवासासाठी उपलब्ध केल्या असून, कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रवाशांना प्रवासामध्ये सामाजिक अंतर ठेवणे व तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासामध्ये केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणीच पिण्याचे पाणी व नैसर्गिक विधीसाठी वाहने थांबविण्याची दक्षता महामंडळाने घेतली असून प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्या भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी अशी विनंती करण्यात येत आहे.

वाचा: गणपतीला कोकणात जाताय; खासगी वाहनांना ई-पास हवाच!

दरम्यान, करोना साथीमुळे गणेशोत्सवासाठी कोकण गाठताना चाकरमान्यांना अनेक विघ्नांचा सामना करावा लागत आहे. खासगी वाहनाने गावी जायचे असल्यास ई-पास सक्ती आहे. तसेच खासगी वाहनं फारच खर्चिक असल्याने चाकरमान्यांसाठी एसटीचा पर्याय बराच दिलासा देणारा ठरला आहे. एसटीने जवळपास तीन हजार बस सोडण्याचे नियोजन आधीच केले होते. त्यात आता १३ ते २१ ऑगस्टपर्यंत विशेष गाड्या सोडल्या जाणार असल्याने चाकरमान्यांची कोंडी दूर झाली आहे.

वाचा: भाजपचा एकही आमदार फुटणार नाही; चंद्रकांतदादांनी मांडलं ‘हे’ गणित!

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment