‘दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमाला महाराष्ट्रातून कोण गेले होते? शोध घ्या’

मुंबई: दिल्लीतील तबलिग-ए-जमात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बऱ्याचशा व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कोण- कोण सहभागी झाले होते, त्यांचा शोध घेण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्रातीलही अनेक जण सहभागी झाल्याची माहिती आहे.

दिल्लीतील या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी २४ जणांना करोनाची लागण झाल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी मंगळवारी दिली. तर हजारांहून अधिक जणांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शेकडो नागरिक सहभागी झाल्याची माहिती समजते. याबाबत राजेश टोपेंना विचारलं असता, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आढळली तर, त्यांना लगेच क्वारंटाइन करण्यात येईल. तसंच त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील जवळपास शंभर जण या कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती समजली. या कार्यक्रमात नेमके किती जण सहभागी झाले होते, त्याचा शोध घेण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. ही खूपच गंभीर बाब आहे. नवी दिल्लीत सोमवारी २५ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातील १८ जण निजामुद्दीनमधील आहेत. करोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळं या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नेमके किती जण सहभागी झाले होते, याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे, असं राज्यातील आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

बिंबिसार नगरमध्ये करोनाचा रुग्ण; नागरिकांना प्रवेशबंदी

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment