कोल्हापुरात करोनाचा पहिला बळी; ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू

कोल्हापूर: छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) विशेष करोना कक्षात उपचार सुरू असलेल्या इचलकरंजीतील ६० वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजता मृत्यू झाला. करोनाचा हा कोल्हापुरातील पहिला बळी आहे. करोनाबाधिताच्या मृत्यूने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मृत रुग्णाच्या चार वर्षांच्या नातवावरही इचलकरंजीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इचलकरंजी येथील कोल्हेमळा परिसरातील त्या रुग्णावर सीपीआरमधील विशेष करोना कक्षात उपचार सुरू होते. २० एप्रिल रोजी त्याला करोना कक्षात दाखल करण्यात आले होते. तो रुग्ण गेल्या चार दिवसांपासून उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेरीस त्याची दहा दिवसांपासून करोनाशी सुरू असलेली झुंज गुरुवारी थांबली. मृत व्यक्तीला अनेक वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता. त्याच्यावर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला सीपीआरमध्ये हलविण्यात आले. त्या व्यक्तीच्या घराशेजारी विजापूर येथून अंत्यविधीसाठी काही नागरीक इचलकरंजी येथे आले होते. त्या परतलेल्या नागरिकांमध्ये दोघांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्या वृद्धाला बाधा झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर तातडीने त्याच्या संपर्कात आलेल्या १९ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, लगेच दोन दिवसांत त्या बाधित व्यक्तीच्या चार वर्षीय नातवाला करोनाची लागण झाली. बाधित व्यक्तीला कोणताही प्रवासाचा इतिहास नव्हता. त्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत भर पडली. जिल्ह्यात समूह संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.

धक्कादायक! मालेगावात योद्ध्यांना करोनाचा विळखा; ४२ पोलीस बाधित, चिंता वाढली

ठाणे शहरात २३ नवे करोनाबाधित, एकूण संख्या २७९ वर

जिल्हा प्रशासनाने करोनाविरोधात कंबर कसली आहे रुग्णांवर उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय राखीव ठेवण्यात आले आहे. शहरातील भक्तीपूजा नगर येथील दोन रुग्ण आणि उचत (ता. शाहूवाडी) येथील एक तरुण करोनामुक्त झाला आहे. शाहूवाडीतील त्या तरुणाच्या आईचा १४ दिवसांनंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचा चुलत भाऊ उपचाराला प्रतिसाद देत आहे. तर कसबा बावड्यातील वृद्ध महिला करोनामुक्त झाली आहे. तिला न्युमोनिया असल्याने खबरदारी म्हणून रुग्णालयात उपचारासाठी थांबवण्यात आले आहे.

उपचाराशिवाय कुणालाही रुग्णालयातून परत पाठवू नका: उद्धव ठाकरे

संवेदनशील घटकांची काळजी घेण्याचे आवाहन

स्थानिक प्रशासनाने या करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सामान्यांना लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रास भेट देऊन तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती व लहान मुले या संवेदनशील घटकांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील कनानगर येथील ३६ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झालं आहे.

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment