कल्याणमधील टांगाचालकांवर उपासमारीची वेळ

टकटक बंद पडल्याने कुटुंबासह घोड्याच्या खाण्याचीही चिंता

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

शिवकालीन ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कल्याण नगरीत मागील सुमारे १५० वर्षांपासून टांगा वाहतूक सुरू आहे. इतर शहरांतील टांगा बंद झाला असला तरी कल्याणमधील सुमारे ४० ते ४५ टांगाचालक आजही कल्याण स्थानक ते दूधनाका परिसरात टांगा व्यवसाय करत असून या टांग्यांना प्रवाशांची चांगली पसंती मिळते. मात्र लॉकडाउनमुळे मागील ५० दिवसांपासून अधिक काळ अन्य वाहतुकीसह टांगा वाहतूकही बंद असून या टांगाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपण एखाद्या दिवशी उपाशी राहू शकतो, मात्र त्या मुक्या जनावरांची उपासमार सहन होत नसल्याची खंत व्यक्त करत टांगाचालकांनी मदतीची मागणी केली आहे.

अन्य शहरांत टांगा वाहतूक जवळपास नामशेष झाली असली तरी कल्याणकरांच्या प्रेमामुळे कल्याण दूधनाका- टिळकचौक ते स्थानक या मार्गावर टांगा वाहतूक नियमित सुरू असते. आजही दूधनाक्यावर सुमारे ४० ते ४५ टांगाचालक दररोज प्रवासी वाहतूक करून उदरनिर्वाह करतात. मात्र करोना लॉकडाउनमुळे रस्त्यावर पडणारी ती घोड्याच्या टापांची टपटप थांबली असून हातावरच स्वतःचे आणि घोड्याचे पोट असलेल्या या टांगेचालकांना नैराश्याने ग्रासले आहे. मागील दोन महिने उसनवार काढत कसेबसे ढकलले, मात्र आता यापुढचे दिवस कठीण आहेत. आम्हालाच खायला मिळत नाही मग घोड्याला खायला कुठून आणायचे? त्या मुक्या प्राण्यांचे होणारे हाल कमी करण्यासाठी तरी सरकारने आपल्याला मदत करावी, दीडशे वर्षांपासूनचा परंपरागत व्यवसाय बंद पडू नये, यासाठी सुरू असलेली आमची तगमग सरकारने समजून घेत आपल्याला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी टांगाचालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून टांगा व्यवसाय बंद असल्यामुळे टांगाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्नसमारंभासाठी घोडे आणि रथाला मागणी असते, मात्र लग्न समारंभदेखील रद्द झाल्याने कर्ज काढून घेतलेल्या रथाचे हप्ते, घोड्याचे खाणे कसे करायचे हा प्रश्न आहे. उसनवारी करून दिवस काढले, परंतु आता उसने पैसेदेखील मिळेनासे झाले आहेत, आता मदत मिळाली नाही तर टांगा व्यवसाय कायमचा संपेल, तो संपू नये, यासाठी आम्हाला मदत हवी आहे.

गुलाम हुसेन, टांगाचालक

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment